Sunday, June 8, 2008

आई मी पावसात जाऊ का

आई मी पावसात जाऊ का
.



आई मी पावसात जाऊ का
थेंबांची टप टप पाहू का
सूंस्सूं वारा धावतोय कसा
वार्‍याशी शर्यत लावू का

आई मी पावसात जाऊ का
सर सर सरी झेलू का
पाऊस गाणी गातंय कोणी
सुरात सूर मिसळू का

आई मी पावसात जाऊ का
चिंब चिंब सुगंध घेऊ का
थेंब थेंब पाण्यात भिजली माती
हातात घेऊन चाखू का

आई मी पावसात जाऊ का
कागदाची होडी सोडू का
साचलंय तिथे थप्प थप्प पाणी
पाण्यात उडी मारू का

आई मी पावसात जाऊ का
नवीन छत्री नेऊ का
पावसाची उडली सात रंगी छत्री
छत्रीत त्याला ही घेऊ का

आई मी पावसात जाऊ का
आई मी पावसात जाऊ का


स्वाती फडणीस ........ ०७-०६-२००८

0 comments: