रविवार, ३० जुलै, २०१७

खिडकी पल्याड कधीचा
पाऊस थांबलेला
दबकीच साद ये काना
खर्ज सूर लागलेला

अलवार स्पर्श अमृताचा
नि हलकासा शहारा
रेंगाळूनी चहू दिशांना
अोढळ आषाढ सारा

मनमुराद भिजून घेता
नजर बाहुल्या या
अवचित भास काना
गाई अंगाईच जणू हा

मऊशार, उबदार धारा
वेढून घेती गात्रां
अनाहत खर्ज दबका
लांघून ये तावदाना

==============
स्वाती फडणीस
२००७२०१७

गुरुवार, २७ जुलै, २०१७

आकार साकार

आकार साकार
====================

डाव्या हाताकडोनी
उजव्या हाताचे दिशेस
रेघ ओढता सरळ
घेई शीर्षरेषा आकार

वरूनि या येई खाली
जी धरूनि ओळंब्यास
ती काठी, जणू आधार
तोलूनिया धरे स्वर

जसे शिर धडावरी
गाठोड्यागत गोल गाठ
एक, एकाची गुंफित माळ
जाई खोल, सर्व दूर

पदर जणू डोईवरी
थाट, आब, रीत-भात
मुरका घेऊन झोकात
खालुनिया जाय वर

रेघ रेघ गं कौतिकाची
गिरविता एक संध
मोत्या माणकांचा सर
तशी सरस्वती साकार

एक, एक, रेघ, रेघ
एक, एक, एकसंघ

====================
स्वाती फडणीस ... २८०७२०१७

गुरुवार, २० जुलै, २०१७

खर्ज

================

खिडकी पल्याड कधीचा
पाऊस थांबलेला
दबकीच साद ये काना
खर्ज सूर लागलेला

अलवार स्पर्श अमृताचा
नि हलकासा शहारा
रेंगाळूनी चहू दिशांना
अोढळ आषाढ सारा

मनमुराद भिजून घेता
नजर बाहुल्या या
अवचित भास काना
गाई अंगाईच जणू हा

मऊशार, उबदार धारा
वेढून घेती गात्रां
अनाहत खर्ज दबका
लांघून ये तावदाना

==============
स्वाती फडणीस
२००७२०१७

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

चक्री

=================

लाट येई, लाट जाई
भिजे निथळून जाय रेती..
भरती ओहटीच्या नर्तनी
काही खुणा राहती तिरी..!

दिस येई, दिस जाई
लखलखे विझे पाणी..
रुप्प पाझरत्या राती
चांदी शिंपून जाती माथी..!

श्वास येई, श्वास जाई
जळे आत काही बाही..
क्षणो क्षणीच्या मरणांसी
प्राण जाता? खळ नाही..!!

=================
स्वाती फडणीस २६०२२०१७

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

ओळीवरुन कविता
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही..!  

दु:ख हे आभासी
============================
'माझ्या मनाप्रमाणे' काहीच होत नाही…!
दुःखात या आभासी मी आता रमत नाही.
ठाऊक मला आताशा..
घडते इतकेच कधी की;
इच्छा अन पूर्ततेची वेळा जूळत नाही..!!

मनी येईल जे कधी का त्या झपटून ल्यावे..
ही रित पूर्ततेची त्या मुळीच रुचत नाही.
माझे म्हणोनि जे का असे ते पावो मजसी,
इतकीच अपेक्षा असे तरी..
तृप्तीचा अमृत सोहळा येथे रंगत नाही.

वेडे भुलते, हरवते मायेच्या अद्भुत बाजारी..
करी कामना उंच झुल्याची..
तरी धावे, खेळे घसरगुंडी..!
एकची एक मनीषा अखंड उरी बाणावी;
हे ऐसे काही करणे त्याला साधत नाही.

स्वभाव दोष असा की हुकले कितीक काही..
तरी स्व अभिमानी कण्याचा ताठा सरत नाही.
इच्छा, इच्छा म्हणोनी,
न अगतिक, ना लाचार होई..
जणू त्यासच त्याची आकांक्षा कळत नाही.

त्या संगे हितगुज करते, समजूनी घ्यावे म्हणोनी..
क्षणी एका वाटे गेले संभ्रम सारे सरोनी..
मग कुस बदलता जराशी,  
वाटे की भ्रम असावा तोची..!  
नि ज्या प्रमाण म्हणावे, ऐसे काही न यावे हाती.

ती मनीषा त्या क्षणाची..
ही निराशा केवळ एका याच क्षणाची..
इतके समजून घेता; दुःख सरे आभासी.
प्रमाण चंचलतेचे मी कुठेच लावत नाही.
ती फसवी निराशा या मनास ग्रासत नाही.

'माझ्या मनाप्रमाणे' काहीच होत नाही..!  
दुःखात या आभासी मन आता रमत नाही.

==============================
स्वाती फडणीस.......................... ०७१०२०१६